“….आणि कोट्यवधींची खंडणी मागणाऱ्या तोतया वकिलावर गुन्हा दाखल”

0
476

पुणे, दि.२३ (पीसीबी) : स्वत:ला भ्रष्टाचार विरोधी गांधीगिरी जनआंदोलनाचा सदस्य म्हणविणारा व जनहित याचिका दाखल करुन बांधकाम व्यावसायिकां कडून खंडणी मागणारा तोतया वकिल राजेश बजाज याचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध जनहित याचिका दाखल करुन ती मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज ऊर्फ सचदेव (रा. अकुर, कमला नेहरु पार्कसमोर, डेक्कन जिमखाना), के. अ‍े. कुरेशी (रा. मलकाजी वाडा, खडकी बाजार), अशोक शंकरराव जाधव (रा. राजा बंगलो, खराडी) आणि बापू गोरख शिंदे (रा. नर्‍हेगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार एप्रिल २०१५ ते २४ जुलै २०१९ दरम्यान शिवाजीनगर कोर्ट गेट नं. ३ च्या समोर रोडवर घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीची एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे बोपोडी येथील बांधकामाची परवानगी चुकीची आहे, याबाबत राजेश बजाज व इतरांनी मुंबई हायकोर्टात सिव्हील अ‍ॅप्लीकेशन केले होते. त्यावेळी तिघांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात तिघांनी २० ते ३० ऑगस्टपर्यंत राजेश बजाज यांना डेंग्यु झाला व त्यांना बेड रेस्ट घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच के अ‍े कुरेशी यांना व्हायरल संक्रमण झाले असल्याने सुनावणीच्या वेळी हजर राहू शकले नसल्याचे नमूद केले. त्या तिघांनी सादर केलेले मेडिकल प्रमाणपत्र हे बनावट करुन दाखल केल्यामुळे कंपनीची व कोर्टाची फसवणुक केली आहे. तसेच हायकोर्टात जनहित याचिकेची फेरसुनावणी करण्याकरीता केलेल अर्ज मागे घेणेकरीता ऑगस्ट २०१८ मध्ये शिवाजीनगर कोर्ट गेट नं. ३ च्या समोर रोडवर त्यांनी १ कोटी रुपयांची मागणी करुन, शिवीगाळ करुन कंपनीसह फिर्यादी व फिर्यादीच्या कंपनीचे डायरेक्टर यांना संपवेन अशी धमकी दिली होती.

या चौघांनी आम्हाला जीवे मारण्याची व कंपनीच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण करण्याची धमकी देऊन आमच्या विरोधात विनाकारण न्यायालयात अर्ज करीत होते. त्या भितीपोटी आम्ही तक्रार दिलेली नव्हती. पंरतु, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याबाबत प्रसारमाध्यमातून समजल्याने आम्ही त्याने दिलेल्या त्रासाबाबत त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलो असल्याचे गोखले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. गोखले यांच्या फिर्यादीनुसार राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध बिल्डरला ५० लाखांची खंडणी मागून जबरदस्तीने फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजेश बजाज व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने राजेश बजाज याला यापूर्वी अटक केली होती. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि त्यांच्या पथकाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.