हत्येच्या घटनांनी शहर आज पुन्हा हादरलं; गेल्या आठ दिवसात शहरातील ही खुनाची सातवी घटना

0
290

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – हत्येच्या घटनांनी पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहर आज पुन्हा एकदा हादरलं आहे. थेरगाव येथील कंट्री वाईन शॉपसमोर तरुणाची हत्या करण्यात आली. गेल्या आठ दिवसात शहरातील ही खुनाची सातवी घटना आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौकात रोहन कांबळे नावाच्या युवकाचा मारेकऱ्यांनी खून केला. कंट्री वाईन शॉपच्या समोर ही हत्या झालेली आहे. वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या आठ दिवसातील ही सातवी खुनाची घटना आहे. त्यामुळे एकूणच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दारुच्या नशेतील तरुणाचा गळा चिरला
दरम्यान, दारुच्या नशेत असलेल्या व्यक्तीची गळा चिरुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच पिंपरी चिंचवड शहरातील नेवाळे वस्ती भागात घडली होती. मात्र त्याची हत्या कोणी आणि का केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वीरेंद्र वसंत उमरगी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वीरेंद्र उमरगी यांचे पत्नीशी भांडण झाले होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ते विभक्त राहत होते. वीरेंद्र यांना दारु पिण्याचे व्यसन होते. दारु पिणारे मित्र त्यांच्याकडे ये-जा करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. त्यांच्या एका मित्राने फोन केला पण वीरेंद्र यांनी उचलला नाही. त्यामुळे मित्राने वीरेंद्र यांच्या घरी येऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळून आला. वीरेंद्र यांची दारुच्या नशेत हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून आरोपी फरार झाले आहेत.

पिंपरीतही महिलेचा राहत्या घरी गळफास
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड मधील सांगवी भागात महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्याच ठिकाणी रक्ताने माखलेली एक डायरीही आढळली होती. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील सांगवी या भागात एका महिले स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यासाठी महिलेने तिच्याच ओढणीचा उपयोग केला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड या भागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे महिलेने आत्महत्या नेमकी का केली, हे समजू शकलेले नाही.