शिवसेनेचा लोकसभेसाठी स्वबळाचा नारा; मात्र, सक्षम उमेदवारांची वानवा

0
1278

 मुंबई, दि. ३ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुका ‘स्वबळा’वर लढण्याचा पुनरूच्चार    शिवसेनेने केला आहे. मात्र, पक्षाचे संघटनात्मक जाळे  राज्यात सर्वत्र भक्कम  नसल्याने  लोकसभेच्या राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्यास अवघड झाल्याने   शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला आहे. सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी  स्वबळावर लढण्यासाठी  काही मतदार संघात सक्षम  उमेदवार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे  इतर पक्षांतील तगड्या उमेदवारांचा शोध घेण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरूवात केली आहे.  

शिवसेनेच्या मुंबईतील बैठकांमध्ये विदर्भ, मुंबई परिसरातील मतदारसंघांचा आढावा ठाकरे यांनी घेतला. यावेळी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी सक्षम उमेवारांची चाचपणी कऱण्यात आली. मात्र, काही मतदारसंघात निवडून येणार उमेदवार नसल्याचे समोर आले. त्यासाठी इतर पक्षातून उमेदवार आयात करावे लागतील. त्यावेळी पक्षाचा विचार करून त्यांना सहकार्य करण्याची तयारी ठेवा, अशा सुचना उध्दव ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

मुंबई, कोकण, काही प्रमाणात मराठवाडा वगळता राज्यात शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले नाही.   राज्याच्या अनेक भागात संघटनात्मक ताकदीचा अभाव  आहे. ठाकरे यांना त्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे  त्यांनी नेत्यांना समजुतीने घेण्याचा सल्ला दिला आहे.  त्यामुळे भाजपच्या धोरणाचा अवलंब करत शिवसेनाही आता इतर पक्षातील लोकांना उमेदवारी देण्यासाठी गळ घालणार असल्याचे दिसून येत आहे.