चूल आणि मूल यात गुरफटल्यामुळे स्त्रीयांवरील अत्याचार वाढले – अमृता फडणवीस

0
1214

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – मुघल आणि ब्रिटीशांसारख्या परकीय आक्रमणांनी स्त्रीयांचा सन्मान कमी होत गेला. घरात मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव वाढत असल्याने आजची “स्त्री” चूल आणि मूल यात गुरफटत जाऊन तिच्यावरील अत्याचार वाढत गेले, असे प्रतिपादन अॅक्सिस बँक पश्चिम विभाग उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांनी पिंपळेगुरव येथे शनिवारी (दि. १) केले.

पुणे विभागाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने आयोजित ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाप्रसंगी अमृता फडणवीस यांच्याहस्ते पिंपळेगुरूव येथील नटसम्राट निळू नाट्यगृहात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातून विविध संस्था, संघटना यांच्या माध्यमातून सामाजिक दायित्व स्वीकारून कौतुकास्पद कार्य करणाऱ्या प्रियदर्शनी हिंगे, प्राजक्ता खानविलकर, रमा मालखरे, आदिती खोत, ओवी सातपुतेष आणि लक्ष्मी गालफाडे या युवतींचा गौरव करण्यात आला. यावेळी संघाचे पुणे महानगर बौद्धिख प्रमुख सुधीर गाडे, गणेश वागदरे, डॉ. गीत आफळे, डॉ. गिरीश आफळे, डॉ. प्रवीण भडगाव, प्रभाताई नातू आदी उपस्थित होते.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाल्या, पुरातन काळापासून भारतीय स्त्रीयांना मानाचे स्थान होते. न्युझीलंडच्या पंतप्रधान जटिंडा आर्डन यांनी बाळंतपणानंतर केवळ सहा आठवड्यांनी पार्लमेंटमध्ये जाऊन कामाला सुरूवात केली. आपल्या छोट्या मुलीला सोबत घेऊन त्या देशाचा कारभार पाहत होत्या. आपल्याकडेही मुलांना कामावर घेऊन जाण्यासाठी सुविधांची निर्मिती करणे, काळाची गरज झाली आहे.

मुघल राजवटीनंतर घरात मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव वाढले. रस्त्यावर वावरणाऱ्या स्त्रीयांकडील पाहण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. त्यामुळे आजची ‘स्त्री’ चूल आणि मूल यात गुरफटत गेली, त्यामुळे ती अन्यायाला बळी पडत आहे, असे अमृता फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.