आशियाई क्रीडा स्पर्धा; पाकचा पराभव करून भारतीय हॉकी संघांने पटकावले कास्यपदक  

0
476

जकार्ता, दि. १ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ अशा गोलफरकाने पराभव करत कांस्यपदक पटकावले. भारताच्या हॉकी संघाला उपांत्य सामन्यात मलेशियाविरुद्ध धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवामुळे भारताचे सुवर्णपदक हुकले होते.

भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. तिसऱ्या मिनिटाला आकाशदीपने गोल डागून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हरमनप्रीतने ५०व्या मिनिटाला दुसरा गोल डागला आणि हाच गोल निर्णायक ठरला. पाकिस्तानकडून ५१व्या मिनिटाला अतीक अहमदने एकमेव गोल डागला. पाकला ४ पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र, त्यांना या संधीचा फायदा घेता आला नाही. भारताच्या बचावफळीने चोख कामगिरी बजावत पाकचे आक्रमण परतवून लावले.

हॉकीतील कांस्यपदकामुळे भारताची पदकसंख्या ६९ वर पोहोचली आहे. त्यात १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्यपदकांचा समावेश असून पदकतालिकेत भारत आठव्या स्थानी कायम आहे.