7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न

0
239

औरंगाबाद,दि.१६(पीसीबी) – औरंगाबादमध्ये अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. सगळ्या भयंकर म्हणजे नराधम आरोपीने पीडितेच्या ओठांचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटला असल्याची माहिती समोर येत आहे.

औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी भागातील ही घटना आहे. एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तिने रोखण्याचा प्रयत्न केला असता नराधमाने तिच्या ओठाचा चावा घेतला. यामध्ये चिमुकलीचा ओठ तुटल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पीडित मुलीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेतला असता नराधम फरार झाला.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, लहान वयात असा धक्कादायक प्रकार घडल्याने पीडितेला धक्का बसला आहे. तर आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.