चोख नियोजन करुन बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करा – आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

0
1003

 

पुणे, दि.२४ (पीसीबी) – देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रामुख्याने राज्यात पुणे आणि मुंबई या दोन मुख्य शहरांमध्ये कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य प्रशासन, नर्स, डॉक्टर आपले कर्तव्य बजावत आहेत.

तसेच ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना प्रतिबंधासाठी त्या-त्या विभागप्रमुखांनी व डॉक्टरांनी आपली भुमिका पार पाडावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात ससून रुग्णालयाच्या विविध विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते म्हणाले की,’रुग्णांवर वेळेत आणि योग्य प्रकारे उपचार होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. रुग्णांच्या स्वॅब तपासणीच्या नमुन्यांचा अहवाल वेळेत पाठवावा,’ अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी इ. माहितीचे संकलन अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देवून समुपदेशानासाठी तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईन, पीपीई किट, व्हेंटीलेटर्स, आदींची उपलब्धता, विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग, विषयांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.