लोणावळ्यातील श्रीक्षेत्र एकवीरा देवी मंदिर परिसरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत आणि नव्याने प्रस्तावित रोपवे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, या मागण्यांसाठी वेहरगाव आणि दहिवली ग्रामस्थांनी रविवारी आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको आंदोलन केले. पावसाची पर्वा न करता महिला, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मंदिर परिसरात पायऱ्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वाहतूक आणि सुरक्षाव्यवस्था यांसारखे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. संबंधित विभागांकडे वारंवार मागणी करूनही अपेक्षित कामे झालेली नाहीत. कार्ला फाटा ते एकवीरा देवी मंदिर आणि गडाकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली.
आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने ग्रामस्थांशी चर्चा केली. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून मागण्या जाणून घेतल्या आणि ३ सप्टेंबर रोजी सर्व संबंधित शासकीय विभागांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको तात्पुरता मागे घेतला.
मात्र प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर नवरात्रोत्सवाच्या काळात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा विकासाला विरोध नाही; पण आधी मंदिर परिसरातील मूलभूत समस्या सोडवाव्यात आणि स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगारावर परिणाम होईल असा रोपवे प्रकल्प रद्द करावा.
भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेता देवस्थान परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच अनधिकृत वाहतूक आणि मंदिर परिसराच्या पावित्र्याला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली.

