पिंपरी , दि. १८ – ‘वकिलांनी देशभक्त चित्तरंजन दास यांची भूमिका अंगीकारून न्यायासाठी लढावे!’ असे आवाहन केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बहाई सेंटर, कोर्ट चेंबर, चर्चगेट, मुंबई येथे गुरुवार, दिनांक १६ जुलै २०२६ रोजी व्यक्त केले. दर्द से हमदर्द तक ट्रस्ट, सुप्रा लीगल फाउंडेशन आणि रिनोव्हेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जस्टिस फॉरवर्ड २०२६’ या विशेष परिषदेत मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना अर्जुन राम मेघवाल बोलत होते. महाराष्ट्र राज्य कॅबिनेट कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, भारत सरकारचे डेप्युटी साॅलिसिटर जनरल ॲड. प्रवीण फलदेसाई, ॲडिशनल जनरल ॲड. अनिल सिंग, दर्द से हमदर्द तक ट्रस्टचे सचिव ॲड. प्रकाश साळसिंगीकर, सुप्रा लीगल फाउंडेशनच्या संचालिका ॲड. सुनीता खंडाळे – साळसिंगीकर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतिश गोरडे, रिनोव्हेट इंडियाचे प्रथमेश रावराणे, ॲड. रवींद्र लोखंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
अर्जुन राम मेघवाल पुढे म्हणाले की, ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सगळेच सहानुभूती व्यक्त करतात; परंतु न्यायापासून वंचित असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कैद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दर्द से हमदर्द तक ट्रस्ट करीत असलेले कार्य खरोखरच स्तुत्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महर्षी अरविंद घोष यांच्यावर ब्रिटिश सरकारने खटला दाखल केला होता. त्यावेळी अरविंद यांनी कोणत्याही वकिलाला आपली बाजू मांडण्यासाठी नियुक्त केले नव्हते; परंतु देशभक्त चित्तरंजन दास यांनी स्वतःहून तो खटला लढवला आणि अरविंद घोष यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता केली होती. त्यामुळे महर्षी अरविंद घोष यांना देशासाठी खूप मोठे योगदान देता आले. त्यामुळेच विधी क्षेत्रातील भावी वकिलांनी चित्तरंजन दास होऊन काम केले पाहिजे!’ ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी प्रास्ताविकातून कायदेशीर मदतीचे बळकटीकरण आणि भविष्यातील वकिलांचे सक्षमीकरण ही परिषदेची मुख्य संकल्पना असल्याची माहिती दिली. यावेळी विधी श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लीगल एड चॅम्पियन्सचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला; तसेच २०२६ विधी साहाय्य (Legal Aid), संरक्षण वकील व्यवस्था (Legal Aid Defence Counsel System),
एमएसएलएसए (MSLSA), डीएसएचटी (DSHT) आणि सुप्रा लीगल फाउंडेशन (Supra Legal Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले सर्वेक्षण प्रकाशित करण्यात आले. मंगल प्रभात लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. रवि रंजन यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. रवींद्र लोखंडे यांनी आभार मानले. संयोजनात ॲड. गणेश नागरगोजे, ॲड. ओंकार पाटील, ॲड. भूषण पाटील, ॲड. अशी नारायण, ॲड. विघ्नेश सुब्रमण्यम, ॲड. नितीन हजारे यांनी सहकार्य केले.

