पिंपरी, दि. २२- जुलमी ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध करून देशस्वातंत्र्याचा संकल्प करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी महान भारत घडविण्याचा आपण संकल्प करूया!’ असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी चापेकर पुतळा, गणेशखिंड, पुणे येथे रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित पुण्यातील गणेशखिंड ते चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय दरम्यानच्या मशाल दौड आणि बाईक रॅलीचे उद्घाटन करताना बलकवडे बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, डाॅ. शकुंतला बन्सल, डाॅ. नीता मोहिते, व्यवस्थापक अतुल आडे, ॲड. अक्षय कदम या मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गिरीश प्रभुणे म्हणाले की, ‘चापेकर बंधू लोकमान्य टिळकांच्या सहवासात आले आणि त्यांनी देशस्वातंत्र्यासाठी क्रांतीचा मार्ग स्वीकारला. त्याचवेळी महात्मा गांधी यांनी शांतीचा मार्ग स्वीकारला होता. चापेकर बंधूंनी रॅण्डचा वध करून हौतात्म्य स्वीकारले; पण या इतिहासाच्या खुणा जपून ठेवण्यात हेळसांड करण्यात आली. पांडुरंग बलकवडे यांनी पुण्याचा प्रेरणादायी इतिहास जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे!’ पांडुरंग बलकवडे पुढे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यापासून आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी प्रेरणा घेतली. त्यांच्याकडून वासुदेव बळवंत फडके यांनी प्रेरणा घेतली; आणि त्यातून १८५७च्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा असंख्य क्रांतिकारकांनी घेतली. वास्तविक असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असूनही त्याचे श्रेय एखाद्या व्यक्तीला देणे म्हणजे त्या सर्व क्रांतिकारकांच्या बलिदानाची कुचेष्टा करण्यासारखे आहे. त्यामुळेच २२ जून या दिनाचे स्मरण करणे म्हणजे क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या हौतात्म्याला अभिवादन करणे होय! स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर झाले पाहिजे. उद्याचा भारत हा भय, भ्रष्टाचार, दहशतवादमुक्त आणि मानवतेची चौकट असलेला विज्ञाननिष्ठ भारत घडविण्याचा संकल्प आपण करूया!’ ॲड. सतिश गोरडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोक नगरकर यांनी आभार मानले.
त्यानंतर गणेशखिंड येथील चापेकर बंधू पुतळा, विद्यापीठ रस्ता, औंध गाव, काळेवाडी चौक, तापकीर चौक, डाॅ. हेडगेवार पथ, केशवनगर शाळा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांतिवीर चापेकर चौक, गांधीपेठ, चापेकर उर्दू शाळा ते क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय या मार्गावर मशाल दौड आणि बाईक रॅली काढण्यात आली होती. यामध्ये पारंपरिक वेषभूषेतील महिलांसह विविध वयोगटातील पुरुषांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी देशभक्तिपर घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या संयोजनात सागर शेवाळे, हर्षदा धुमाळ, सौ प्राजक्ता कदम, विशाल पाटील, किरण गायकवाड, विक्रम कुसाळकर, रोहित मोहिते, भीमराव जाधव, हृषीकेश हंकारे, रोहित बडे, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे, महेश नरवडे यांनी परिश्रम घेतले.
