उद्योजकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही

bpcauthor bpcauthor
1 Min Read

अहिल्यानगर, दि. ८ : औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही-गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ होताना येथे काहीजण उद्योजकांना त्रास देण्याचे ‘उद्योग’ करत आहेत, अशी माहिती आपणाला मिळाली आहे. उद्योजकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही. अशा घटकांना ठोकून काढू, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. लगेच त्यांनी ठोकून काढू म्हणजे कायद्याने ठोकून काढू अशीही पुस्ती जोडली.

अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील सुपा (ता. पारनेर) औद्योगिक क्षेत्रातील खाजगी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज, रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार काशिनाथ दाते, आमदार बबनराव पाचपुते, हभप नामदेवशास्त्री, हभप महंत शिवाजी महाराज यावेळी उपस्थित होते.

नागरिकांना उद्योगांकडून त्रास होत असेल तर अधिकृत यंत्रणेकडे दाद मागा. मात्र त्यांना दिलेला त्रास खपवून घेतला जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्रात नवे उद्योग येत असताना येथे काही वाईट ‘उद्योग’ तयार झाले आहेत. काहीजण उद्योजकांना त्रास देत असल्याची माहिती मिळाली आहे. ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’, उत्पादन खर्च कमी व कायदा-सुव्यवस्था या आधारावर महाराष्ट्रात उद्योग वाढ होत आहे. मात्र अशा परिस्थितीत औद्योगिक क्षेत्रातील एखादी छोटी घटनाही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गांभीर्याने घेतली जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना मी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Share This Article