चऱ्होली टीपी रद्दची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, चऱ्होली ग्रामस्थांपुढे सरकारही नमले

3 Min Read

पिंपरी, दि. १८ – टीपी रद्द करण्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भोसरी येथील कार्यक्रमात केली. पीसीबी टुडे न्यूज पोर्टने अगदी सुरवातीपासून चऱ्होली ग्रामस्थांची बाजू नेटाने लावून धरली आणि गावकऱ्यांनी वज्रमूठ केल्याने सरकारलासुध्दा माघार घ्यावी लागली. गावबंदी, महामोर्चा, महापालिकेला टाळे ठोकायचा इशारा गावकऱ्यांनी दिल्याने अखेर टीपी स्थगितीची निर्णय रद्द करण्याची वेळ आली.
चऱ्होली गावच्या १४२५ हेक्टरवर पाच विविध टीपी स्किमचा इरादा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी जाहीर केला होता. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाने गावकरी हवालदिल झाले होते. सगळे गाव टीपी योजनेत गेल्यावर पुढच्या पिढीसाठी जमीन शिल्लक राहणार नव्हती आणि प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होणार होते. कोणत्याही परिस्थितीत टीपी योजना रद्द कऱण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली. वारंवार बैठका घेतल्या आणि महापालिका प्रशासनाला इशारा दिला. आमदार महेश लांडगे यांनी या विषयावर बोटचपी भूमिका घेतल्याने गावकरी नाराज होते. माजी महापौर नितीन काळजे आणि कुणाल तापकीर यांनी पुढाकार घेतला आणि गावकऱ्यांनीही त्यांना प्रतिसाद दिला. अखेर राजकारणा सोडून सर्वांनी एकत्र यायचे ठरवले आणि या मुद्यावर गावबंदी, महापापालिका मिळकतकर बंद आणि मुलाबाळांसह शेतीची अवजारे, बैलगाडीसह महामोर्चाचे आयोजन केले होते. वातंवारण तापल्याने अखेर घाबरलेल्या प्रशासनाने प्रकल्प स्थगित ठेवण्याची घोषणा केली होती.
ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ पवार यांच्यासह शरद पवार यांची भेट घेऊन टीपी रद्दची मागणी केली. शेवटचा उपाय म्हणून आज सकाळी गावकऱ्यांनी चऱ्होली येथील पाणी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आणि सरकारला इशारा दिला. जनतेच्या दबावापुढे अखेर टीपी स्किम रद्द कऱण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे राज्यकर्त्यांच्याही लक्षात आले. दरम्यान, महापालिका निवडणुका तोंडावर असल्यानेचिखली, कुदळवाडी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली या भागात भाजपला मोठा फटका बसेल असे लक्षात आल्याने आज टीपी रद्द कऱण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. ग्रामस्थांनी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले आणि टीपी स्किम विरोधी कृती समितीचा जयजयकार केला.
आळंदी रस्त्यावर संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारीत संतसृष्टी या समुह शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कऱण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना फडणवीस म्हणाले,
आपण टीपी स्किम स्थगित केली होती. काही लोक संभ्रम निर्माण करतात, असा समज पसरला होता. मी आताच सांगतो टीपी रद्द करून टाका. जे केले पाहिजे ते जनतेला विश्वासात घेऊन करायचे. या ठिकाणी सुनियोजन पध्दतीनेच विकास झाला पाहिजे. त्यात शहराचे उत्तम झाले पाहिजे. वाढते शहर आहे, नियोजनबध्द विकास झाला पाहिजे अन्यथा पुढची पिढी उद्या तुम्हाला मला विचारेल.

Share This Article