फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचा ‘टप्प्यात आले की कार्यक्रम’ करणार!

2 Min Read

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरात सोसायटीधारकांचे ‘मसिहा’ झालेले सोसायटी फेडरेशन केवळ सत्ताधारी लोकच तुमचे कामे करु शकतात. विरोधकांपर्यंत सदनिकाधारकांना पोहोचू दिले जात नाही. सदनिकाधारक दबावात आहेत. नवीन गृहप्रकल्प निर्माण झाले की, त्या ठिकाणी चेअरमन, सेक्रटरी नेमायचे आणि त्यांना ‘फार्महाऊस’ वर मटन पार्ट्यां द्यायच्या… हा काय बिहार आहे का? असा सवाल महाविकास आघाडीच्या शहरातील नेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी ज्या प्रमाणे काम करीत आहेत. त्यांचा ‘टप्प्यात आले की कार्यक्रम’ करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोशी-चऱ्होलीसह भोसरी परिसरातील वीज समस्यांबाबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्या तथा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी विविध मुद्यांवर आक्रमकपणे भाष्य केले आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, शिवसेना नेत्या रुपाली आल्हाट, माजी नगरसेवक पंकज भालेकर आदी उपस्थित होते.

सुलभा उबाळे म्हणाल्या की, महावितरण प्रशासनाचे अधिकारी सत्ताधारी नेत्यांचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत. ‘‘आमदार बोले आणि अधिकारे हाले’’ अशी परिस्थिती आहे. सोसायटीधारकांनी ५०-५० लाखांचे फ्लॅट घेतले आहेत. त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू दिले जात नाही. सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष व पदाधिकारी व चेअरमन विशिष्ट नेत्यांसाठीच काम करीत आहेत. सत्ताधाऱ्यांकडे गेलो तरच तुमचे काम होईल, असे सदनिकाधारकांना सांगत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण संबोधित करतो. पण, या शहरात रोज लाईट जाते, ही सत्ताधाऱ्यांसाठी शरमेची बाब आहे. बांधकाम परवानगी दिली जाते. हजाराे फ्लॅट्स निर्माण होतात. त्या फ्लॅटधारकांना लाईट, पाणी, चांगले रस्ते, खेळाचे मैदान मिळाले पाहिजे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शहराची दुर्दशा झाली आहे. पोलीस प्रशासन, महावितरण, शासकीय प्रशासन गुलाम असल्यासारखी कामे होत आहेत. शिवरस्ता, मोशी येथील सोसायटी १० वर्षांपूर्वी तयार झाली. तरी त्यांना लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे, ही खेदाची बाब आहे, असेही सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे.

Share This Article