४३ कोटीच्या घोटाळा प्रकरणात ‘या’ बड्या नेत्याची ईडी कडून चौकशी

0
202

श्रीनगर, दि. १९ (पीसीबी) : जम्मू काश्मिरमध्ये 43 कोटींच्या घोटाळा प्रकरणी ईडीने आज (19 ऑक्टोबर) नऐशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची चौकशी केली. ईडी सध्या जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित घोटाळ्याचा तपास करत आहे. फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राजकीय सुडातून ही चौकशी होत असल्याचा आरोप केलाय. उमर म्हणाले, “गुपकार घोषणा करत जम्मू काश्मिरमध्ये महाआघाडी तयार झाल्यानेच सरकारकडून ही सुडाची कारवाई केली जात आहे”.

जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित हा घोटाळा 43 कोटींचा असल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनच्या 10 सदस्यांमध्ये फारूख यांचाही समावेश होता. त्यांच्यावर 2005 ते 2012 दरम्यान अनेक बनावट खात्यांचा उपयोग करुन पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

ईडीच्या कारवाईनंतर उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलं, ‘नॅशनल कॉन्फरन्स पक्ष ईडीने पाठवलेल्या समन्सचं उत्तर देईल. घोषणा करत जम्मू काश्मिरमध्ये महाआघाडी तयार झाल्यानेच राजकीय सुडासाठी ही कारवाई केली जात आहे.’ यावेळी उमर अब्दल्ला यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या घरावर कोणतीही धाड टाकली नसल्याचंही स्पष्ट केलं.

क्रिकेट असोसिएशनशी संबंधित घोटाळा 2012 मध्ये उघड
जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित हा घोटाळा 2012 मध्ये समोर आला होता. तेव्हा JKCA चे कोषाध्यक्षांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. यात माजी महासचिव मोहम्मद सलीम खान आणि माजी कोषाध्यक्ष एहसान मिर्जा यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यानंतर या घोटाळ्यात एकापाठोपाठ 50 नावं जोडली गेली. यानंतर अब्दुल्ला यांनी JKCA च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते 30 वर्षांपासून या पदावर होते.