२४ तासात शिवसेनेला भाजपने दिला राजकीय धक्का; ‘या’ १० शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

0
385

मुंबई, दि.२७ (पीसीबी) :विरोध बाकांवरील भाजपाला मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं मोठा राजकीय धक्का दिला. भाजपाच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं. या राजकीय घडामोडीला २४ तास लोटत नाही, तोच भाजपाने याचा वचपा काढला. भाजपाने माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात उपनगराध्यक्षांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोल्हापूर येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. भाजपा आणि एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं भाजपाला बुधवारी जोरदार धक्का दिला. भाजपाच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती प्रवेश केला. हा गिरीश महाजन आणि भाजपाला मोठा धक्का असल्याचं बोललं जात होतं. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं दिलेल्या धक्क्याचा भाजपाने २४ तासांच्या आतच वचपा काढला.

मुक्ताईनगरमध्ये खूश झालेल्या शिवसेनेची भाजपाने माथेरानमध्ये परतफेड केली. शिवसेनेच्या उपनगराध्यक्षांसह १० नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन तोडून भाजपाचे कमळ हाती घेतले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. एकाच वेळी दहा नगरसेवकांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपात प्रवेश केल्यानं माथेरानमधील सत्ताचित्रच बदललं आहे. कोल्हापूरमध्ये हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भूमिकाही मांडली आहे. दरम्यान, आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष), राकेश चौधरी (नगरसेवक), सोनम दाबेकर (नगरसेवक), प्रतिभा घावरे (नगरसेवक), सुषमा जाधव (नगरसेवक), प्रियांका कदम (नगरसेवक), ज्योती सोनवळे (नगरसेवक), संदीप कदम (नगरसेवक), चंद्रकांत जाधव (नगरसेवक), रुपाली आखाडे (नगरसेवक) यांनी भाजपात प्रवेश केला.