‘सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही’

0
290

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षणाचा पेच, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे राज्यापुढे उभे ठाकलेले आर्थिक संकट, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना या विषयांवरही चर्चा झाल्याचं कळतंय. तौक्ते वादळामुळे कोकणासह राज्यातील अनके भागाचं नुकसान झालं आहे. केंद्राकडून तोकडी मदत मिळाली आहे. त्यावर आणि राज्याकडून जाहीर करावयाच्या पॅकेजवरही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं काय करायचं? याबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडून सल्ला घेतल्याचं सांगितलं जात आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.