अपहरण, खुनीहल्लाप्रकरणी आमदार पुत्राला अखेर अटक

0
513

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : ठेकेदाराच्या कार्यालयात घुसून कामगारांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी तसेच सुपरवायझरचे अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या प्रकरणात फरारी असलेल्या आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ याला अखेर पोलिसांनी रत्नागिरीतून अटक केली. मागील पंधरा दिवसांपासून तो फरारी होता.

सिद्धार्थ बनसोडे याच्यासह, आमदारांचे पीए व इतर आठजण यांनी ११ मे रोजी (मंगळवार) एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड मुंबई या ठेकेदार कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात शिरून कामगारांना बेदम मारहाण केली. धनराज बोडसे, अमोल कुचेकर यांना हाताने तर विनोदकुमार रेड्डी यांना लोखंडी टॉमी सारख्या शस्त्राने डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह साथीदारांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे.

दुसरी घटना १२ मे रोजी ( बुधवार) घडली. ११ मे रोजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी पवार आमदार बनसोडे यांना उलटे बोलले असल्याचा समज आरोपींचा झाला. त्यातुन सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान आणि त्यांचे दहा ते पंधरा साथीदारांनी १२ मे रोजी सकाळी ११ वाजता पवार यांचे हेडगेवार भवन, आकुर्डी येथील त्यांच्या ऑफिसमधून बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी अपहरण केले. त्यांना काळभोरनगर येथील एका कंपनीच्या कार्यालयात आणले. तिथे सिद्धार्थ बनसोडे व साथीदारांनी हाताने, लथाबुक्क्यांनी, चामडी पट्टयाने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. सिद्धार्थने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणीही सिद्धार्थ याच्यावर अपहरण, खुनी हल्ल्याचा गुन्हा सिद्धार्थ बनसोडे याच्यावर दाखल आहे.

या घटनेप्रकरणी इतर काही आरोपींना अटक झाली. मात्र, पंधरा दिवस उलटूनही आमदार पुत्र पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. पोलिसांची पथके सिद्धार्थ याच्या मागावर होती. अखेर त्याला गुरुवारी (ता.२७) रत्नागिरीतून अटक करण्यात आली.

आमदारांवरील गोळीबारप्रकरणी तिघांवर दाखल आहे गुन्हा
आमदार बनसोडे यांच्यासह त्यांचा मुलगा व कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी), संकेत शशिकांत जगताप, श्रीनिवास बिरादार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सावनकुमार रमेश सलादल्लू (वय ४८, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पवार काम करत असलेल्या कंपनीत स्थानिक तरुणांना नोकरीस घ्यावे आमदार अण्णा बनसोडे यांनी चर्चेसाठी पवार याला बोलावले. बुधवारी (ता. १२) दुपारी पवार त्याच्या दोन साथीदारांसोबत आला. चर्चेदरम्यान शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी देत आरोपीने आमदार बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार केला.