ह्यदय पिळवून टाकणारी घटना; शाहूवाडीत आईने दोन चिमुकल्यांसह पेटवून घेत केली आत्महत्या

0
650

कोल्हापुर, दि. १९ (पीसीबी) – नेर्ले शाहूवाडी येथील एका आईने दोन चिमुकल्यांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास घडली.

स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. याप्रकरणी शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेर्ले येथील शिवाजी बापू पाटील हे पत्नी नंदा, सून स्वाती, नात विभावरी, नातू देवांश यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयामागील बंगल्यात राहतात. मृत स्वाती यांचे पती महेश २००८ मध्ये सैन्यात भरती झाले असून, सध्या ते जैसलमेर राजस्थान येथे सेवेत आहेत.  २०१३ मध्ये स्वाती यांचा महेश यांच्याशी विवाह झाला. स्वाती या उच्चशिक्षित होत्या. त्या घरीच साडी विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. सासरे शिवाजी पाटील हे माजी सैनिक आहेत. चार वर्षांची मुलगी विभावरी कोकरूड येथील नर्सरी स्कूलमध्ये शिकत होती.

शिवाजी पाटील यांच्या घरातील स्वयंपाकघराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. आज सकाळी सासू नंदा साफसफाई उरकून दोन्ही नातवंडांसह शेजारी नातलगांकडे गेल्या होत्या; तर सासरे शिवाजी हे गावातील एका साखरपुडा कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, सासू नंदा यांच्याकडून स्वाती यांनी जेवण भरविण्याचे निमित्त करून आपल्या दोन्ही मुलांना घरी आणले. काही वेळानंतर शेजारील महिला तेथून जात असताना घरातून धूर बाहेर येत असल्याचे दिसले. त्यामुळे महिलेने आरडाओरड केल्याने ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वाती यांनी खोलीच्या दोन्ही बाजूंना कडी लावल्याने दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सासू व सासरेही तेथे दाखल झाले; परंतु अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने गंभीर भाजल्याने स्वाती व विभावरी या जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या. देवांशची किंचित हालचाल जाणवत असल्याने त्याला उपचारांसाठी कोल्हापूरला नेत असताना  वाटेत त्याचाही मृत्यू झाला. स्वातीने मुलांसह आत्महत्या का केली हे अद्याप समजु शकलेले नाही. शाहूवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.