“हॉटेलला परवानगी देणे म्हणजे तेथे बाकीचे धंदे करा असं काही राज्य सरकार सांगत नाही”

0
215

नाशिक, दि.२४ (पीसीबी) : नाशिकमधील येवला येथे करोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ आले असता यावेळी क्रूझ पार्टीला राज्य सरकारने कशी काय परवानगी दिली? असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता. यावर भुजबळ म्हणाले की, “या पार्टीला कोणी परवानगी दिली हे मला काही माहीत नाही. मात्र हॉटेलला परवानगी देणे, लॉन्सला परवानगी राज्य सरकार देते म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही राज्य सरकार सांगत नाही. म्हणजे सरकार यात कस काय दोषी असतं?” असे भुजबळ म्हणाले. तसेच, “आता मुंद्रा पोर्टला परवानगी दिली गेली तिथे ३० हजार कोटींचे अमली पदार्थ सापडले, मग सरकारने मुंद्राला परवानगी का दिली?” असं कसं विचारता येईल. असंही त्यांनी बोलून दाखवलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपेंची जागा भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये असे भाजपा आमदार पडळकर म्हणालेले आहेत. याबाबत विचारलं असता भुजबळ म्हणाले, “हे सर्व ऑर्डरच सोडत असतात याला जेल मध्ये, त्याला जेल मध्ये , त्या मंत्र्याला जेल मध्ये मग हे सांगितल्यावर कुठली ना कुठली यंत्रणा कामाला लागते. त्यांना म्हणा यापेक्षा तुम्ही काही चांगलं काम करा ना. लोकांना भीती दाखवून लोक काही घाबरणार नाहीत. न्याय यंत्रणा जिवंत आहे, ती न्याय देईल.”
गोपीचंद पडाळकरांनी झेड प्लस सुरक्षेचा गृहमंत्री कुठे सापडेना असा घणाघात केला आहे, यावर भुजबळांना विचारले असता, भुजबळ म्हणाले की, “माजी पोलीस आयुक्त, डीजी हे पण गायब आहेत. त्यांनापण सुरक्षा असते तक्रारदारच मुळात गायब आहे.”

आज संजय राऊत नांदगाव मतदार संघाच्या दौरा आहे त्याबद्दल भुजबळांना विचारले असता, भुजबळ म्हणाले “, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. त्यासोबतच जिल्हाचाही विकास झाला पाहिजे. जिल्ह्याची विकास कधी होईल, जेव्हा सगळ्या तालुक्यांचा विकास होईल. आम्ही अनेक ठिकाणी ऑक्सिजन यंत्र बसवले आहे नक्कीच संजय राऊत नांदगाव येथे गेल्याने आनंदाची गोष्ट असून विकासाच्या दृष्टीने पुढे अजून काय करता येईल, याचा विचार होईल.” असे भुजबळ म्हणाले.