थेरगाव मंगलनगरमध्ये रस्त्याच्या बाजूला लावलेली बेकायदेशीर वाहने जप्त करण्याची मागणी

0
799

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – थेरगाव, मंगलनगर येथील शाळेच्या रस्त्याच्या बाजूने चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे उभी केली जातात. या वाहनांचा आडोसा घेऊन प्रेमीयुगूल अश्लील चाळे करत असतात. त्यामुळे ही बेकायदेशीर वाहने जप्त करून ताब्यात घेण्यात यावीत, अशी मागणी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नवघन यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “मंगलनगर येथील कांतीलाल खिंवसरा व महापालिकेची शाळा आहे. या दोन्ही शाळेसमोर अनेक वाहने बेकायदेशीरपणे उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच या वाहनांचा आडोसा घेऊन प्रेमीयुगुल अश्लिल चाळे करतात. त्याचप्रमाणे काही टवाळखोर मद्य पीत बसतात. त्याचा या रस्त्याने ये-जा करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच भविष्यात याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. या बाबींचा विचार करून या भागात पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवण्यात यावे. याठिकाणी नो-पार्किंगचे फलक लावण्यात यावेत. तसेच येथे बेकायदेशीरपणे लावण्यात आलेली वाहने जप्त करून पोलिसांनी ताब्यात घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, जिल्हाध्यक्ष सुभाष कोठारी, जिल्हा निरीक्षक दिलीप टेकाळे, संघटक मुनीर शेख, कार्याध्यक्ष विकास कांबळे, शहर कार्याध्यक्ष अविनाश रानवडे, उपाध्यक्ष ओमकार शेरे, सचिव लक्ष्मण दवणे, डॉ. सतीश नगरकर, प्रसाद देवळालीकर, जयवंत कुदळे, वैभव कादवाने, भास्कर घोरपडे, सोहनलाल राठोड आदी उपस्थित होते.