…हे प्रकरण स्थानिक आहे; सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

0
383

मुंबई,दि.१४(पीसीबी) – राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे मोघम वक्तव्य शरद पवार यांनी केले.

सध्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटाकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.

काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन प्रकरणावरुन अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. हिरेन मनसुख प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि एकंदरच याप्रकरणाच्या हाताळणीवरुन त्यांनी नापसंती दर्शविली होती.