‘हेच का अच्छे दिन’?, मुंबईत शिवसेनेची इंधनदरवाढीवर बॅनरबाजी

0
647

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – दादर येथील शिवसेना भवनच्या समोर इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेने बॅनर लावून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  बॅनरवर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या २०१५ च्या आणि २०१८ च्या किंमतीतील फरक दाखवून ‘हेच का अच्छे दिन’?, असे लिहून शिवसेनेने पुन्हा एकदा  मोदी  सरकारला टोला लगावला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तत्कालीन काँग्रेस  सरकारवर इंधन दरवाढीवरून तोफ डागली होती. ‘बहूत हुई पेट्रोल-डिझेल की मार’, ‘अब की बार मोदी सरकार’, आणि ‘अच्छे दिन, आयेंगे’, असे म्हणत भाजपने देशातील जनतेला इंधन दरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आणि  ‘अच्छे दिन, आयेंगे’,चे बॅनर लावले होते. भाजपला याची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेने बॅनर लावले असून ‘हेच का अच्छे दिन?’, असा सवाल भाजपला केला आहे.

शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर २०१५ च्या इंधनदराचा आणि २०१८ च्या इंधनदराचा फरक दाखवला आहे. मुंबईत ६४.६० रुपये प्रतिलिटर मिळणाऱ्या पेट्रोलची किंमत ८६.७२ रुपयांवर पोहोचली आहे. डिझेल ५२.९९ रुपयांना मिळणारे आता ७५.७४ रुपयांवर गेले आहे. पेट्रोल-डिझेलप्रमाणे गॅसच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात  वाढ झाल्याचे या बॅनरवर दिसत आहे.