हिंजवडीतील वाहतुकीवर राहणार २५ सीसीटीव्हींची नजर

0
670

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – हिंजवडी येथील वाहतुकीविषयी विविध समस्यांबाबत पॅन सिटी प्रकल्पातील स्मार्ट ट्राफीक कामकाजाअंतर्गत २५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या निर्णयास आज (शुक्रवार) झालेल्या पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळाची आठवी बैठक आज महापालिकेत झाली. ही बैठक  नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी ममता बात्रा, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रमोद कुटे, नगरसेवक सचिन चिखले, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्‌मनाभन, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी पी. एस. खांडकेकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, राजन पाटील, मुख्य वित्तिय अधिकारी जितेंद्र कोळंबे आदी उपस्थित होते.

पॅन सिटी प्रकल्पातील स्मार्ट ट्राफीक कामकाजाअंतर्गत पोलीस आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार  हिंजवडीतील २५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून हे काम टेक महिंद्रा कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी १६ कोटी खर्च अपेक्षित असून एमआयडीसीकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर पोलीस आयुक्त आर.के पद्‌मनाभन यांनी गृह विभागाच्या निधीतून चाकण, तळेगांव येथील एमआयडीसीत सीसीटीव्ही बसविण्याच्या सुचना यावेळी केल्या.