हाथरसची घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना – अजित पवार

0
361

पुणे, दि. २ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध सर्वच स्तरातून केला जात आहे. या घटनेबद्दल बोलायला शब्द नाहीत. कोणत्याही राज्यात अशा प्रकाराच्या घटना घडता कामा नये. अशा घटना घडू नयेत म्हणून कडक कायदे आणि नियम झाले पाहिजेत. याकरिता केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.

आज आपण महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिली आहे. महिला चांगलं काम करीत असून उत्तर प्रदेश येथील घटना निंदनीय असल्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली. यावेळी अजित पवार म्हणाले की, देशातील कोणत्याही भागात घटना घडल्यावर लोकप्रतिनिधी घटनास्थळी जाऊन भेट देत असतात. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन सभागृहात आवाज उठविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी जातात. त्या प्रमाणे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे उत्तर प्रदेश येथील घटनास्थळी भेट देण्यास गेले होते. मात्र कोणीही सत्तेवर असल्यावर अशा प्रकारे थांबवू नये, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. तसेच केंद्रात आणि राज्यात कोणाचे ही सरकार असू द्या, पण अशा प्रकारच्या घटना कोणाच्याही राज्यकर्त्यांच्या काळात घडून देता कामा नये, अशा शब्दात योगी सरकारवर निशाणा साधला.

पार्थच्या ट्विटवर दादा म्हणतात…

यावेळी पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणाच्या ट्विटरवरही अजित पवार यांना प्रश्न विचारला होता. त्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, “ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. अलीकडची मुलं काही ट्विट करतात. प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो, प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो. माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे.”