“स्वामी विवेकानंद हे क्रांतिकारी संन्यासी!”

0
212

पिंपरी, दि.: १३ (पीसीबी) “स्वामी विवेकानंद हे क्रांतिकारी संन्यासी होते!” असे प्रतिपादन हिमालयात बारा हजार फूट उंचीवर पाच वेळा गिर्यारोहण करणारे तसेच पुणे ते कन्याकुमारी हा सोळाशे किलोमीटरचा सायकलप्रवास करणारे ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथील अध्यापक अवधूत गुरव यांनी स्वामी विवेकानंद सभामंडप, शरदनगर, चिखली प्राधिकरण येथे बुधवार, दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी केले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित ‘युवकांसाठी विवेकानंद’ या विषयावरील व्याख्यानात अवधूत गुरव बोलत होते. डॉ. विजय भळगट, उद्योजक महादेव कवितके, पंढरीनाथ मस्के, काका मेदनकर, राजेंद्र घावटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे, महेश मांडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अवधूत गुरव पुढे म्हणाले की, “अफाट बुद्धिमत्तेमुळे बिलेश्वर उर्फ नरेंद्र याला शाळेतून काढून साहित्य, संगीत, कला अशा विविध विषयांच्या शिकवण्या लावण्यात आल्या. त्यामुळे बालवयातच त्याचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू झाले. रामकृष्ण परमहंस यांची भेट होईपर्यंत नरेंद्र हा पूर्णपणे नास्तिक होता. सामान्य जनता शिवस्वरूप मानून तू त्यांची सेवा कर, हा परमहंस यांचा आदेश मानून नरेंद्रने अखंड दहा वर्षे भारतभ्रमण केले. या भ्रमंतीमधून नरेंद्रचे रूपांतर ‘स्वामी विवेकानंद’ या व्यक्तिमत्त्वात झाले. कन्याकुमारी येथील समुद्रातील शिलेवर त्यांनी सलग तीन दिवस ध्यानधारणा केली अन् आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले.

शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेहून परत आल्यावर त्यांनी देशभरात रामकृष्ण मठांची स्थापना केली. पराक्रम, सेवा, त्याग या गुणांनी युक्त असलेले युवकच भारतमातेचे उत्थान करू शकतील हा विश्वास असल्याने त्यांनी युवकांची चळवळ उभारली. शारीरिक बलसंवर्धन हे अध्यात्माइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानणारे स्वामी विवेकानंद हे क्रांतिकारी संन्यासी होते. पूर्वांचलमधील अनेक व्यक्ती आपल्याला समाजात भेटतात; पण त्यांना आपुलकीची वागणूक दिली तरच आपण भारतीय एकात्मता साधू शकू!” असे आवाहन गुरव यांनी केले.

त्यापूर्वी, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानने सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यांत सुमारे एकशेदहा गरजूंनी रक्तगट, शर्करा तपासणीचा लाभ घेतला; तर एकावन्न व्यक्तींनी रक्तदान केले. याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील सुमारे बहात्तर नवयुवकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. कोरानाच्या पार्श्वभूमीवर उपक्रमांमध्ये सुरक्षानियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. मोजक्याच व्यक्तींनी प्रत्यक्ष आणि परिसरातील अनेक नागरिकांनी ऑनलाईन सुविधेद्वारा व्याख्यानाचा लाभ घेतला.

आरोग्यशिबिर आणि व्याख्यानासाठी सुनील पंडित, सुनील खंडाळकर, शंकरराव बनकर, अशोक हाडके, सिद्राम मालगट्टी, हंबीरराव भिसे, वैजनाथ गुळवे यांनी परिश्रम घेतले. राजेश चिट्टे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद वेल्हाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संतोष ठाकूर यांनी आभार मानले.