सोमवार पासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या `ऑनलाईन` शाळा

0
470

>> ४० हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणारी राज्यातील पहिलीच महापालिका

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीतही शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे, सरकारी पातळीवर निर्णय होत नाही. केंद्र सरकार राजी आहे तर राज्य सरकार रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नाही. इस्त्राईल मध्ये सुरू केलेल्या शाळाचा अनुभव वाईट आहे, तिथे ३४५ विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याचे समोर आल्याने सुरू केलेल्या शाळा अवघ्या पंधरा दिवसांत बंद करण्याची वेळ सरकरावर आली. या सगळ्या अनुभवातून पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहाणपण घेतले आहे. महापालिका शाळेत शिकणाऱ्या ४० हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. पालिकेच्या पहिली ते आठवीच्या १०५ शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून धडे देण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून अशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण देणारी राज्यातील ही पहिलीच महापालिका असेल.

शिक्षक व्हिडिओ रेकॉर्ड करुन विद्यार्थी, पालकांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविणार आहेत. विद्यार्थ्यांकडील स्मार्टफोनसह अन्य संपर्कांच्या माध्यमांचे महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. सरकारच्या दिक्षा अॅपसह सर्व माध्यमांचा उपयोग करुन महापालिका प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार येत्या सोमवार (दि.१५) पासून महापालिकेच्या शाळेची ऑनलाईन घंटा वाजणार आहे. याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.
माहिती देताना शिक्षणाधिकारी शिंदे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दु शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गामध्ये ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ११०५ शिक्षक कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जूनमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत शाळा सुरु करता येणार नाहीत. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही. याची खबरदारी घेतली आहे. ऑनलाईन शाळा घेण्याचे पूर्णपणे नियोजन केले असून सोमवारपासून ऑनलाईन शाळा सुरु होतील.

शाळेत येवून अथवा घरुन शिक्षक अभ्यासक्रमाचा ‘व्हिडिओ’ तयार करतील. तो पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दररोज सकाळी पाठविण्यात येईल. बहुतांश पालकांकडे स्मार्ट फोन आहेत. शिक्षकांनी तयार केलेले ब्लॉक पाठविण्यात येतील. इयत्तेवाईज धडे दिले जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांची टेस्ट घेतली जाईल. त्याला किती मार्क पडतात. त्यावरुन त्याला समजले आहे की नाही हे लक्षात येईल. फिडबॅकही घेतले जाणार आहेत. स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.
स्वयंसेवक विद्यार्थ्याच्या घरी जाणार आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. स्वयंसेवी संस्थ्यांच्या मदतीने शिक्षकांना ऑनलाईन शिकविण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. त्यानंतर जास्तीत-जास्त ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तक आणि तांदूळही लवकरच वाटप करण्यात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
याशिवाय सीएसआर फंडातून विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे नियोजन देखील आहे. कम्युनिटी रेडिओचा देखील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळले अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्ती केली. प्रत्यक्षात शाळा सुरु करण्याचे निर्देश आल्यास त्याचेही नियोजन केले जात आहे. एकदिवसाआड शाळा सुरु करण्याचा पर्याय समोर आहे.
(फोटो- महापालिका आणि ऑनलाईनचे ग्राफिक्स)