सासऱ्यांनी बाईक नाकारली; नवरदेवाने लग्नाचे विधी सोडून विवाहमंडपातून काढला पळ

0
409

जयपूर, दि. २० (पीसीबी) – हुंडयामध्ये सासऱ्यांनी बाईक दिली नाही म्हणून २२ वर्षीय नवरदेवाने लग्नाचे विधी अर्ध्यावर सोडून विवाहमंडपातून पळ काढला. राजस्थानच्या बारन जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकारानंतर नवरी मुलीने नवरदेव आणि त्याच्या वडिलांविरोधात हारणावाडाशाहाजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

शनिवारी सकाळी नवरदेव पुन्हा मुलीच्या घरी आला व चर्चा सुरु केली. नवरा मुलगा विवाहाच्या विधीसाठी राजी झाला. तोपर्यंत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मेघराज लोढा असे नवरदेवाचे नाव असून तो झालावार जिल्ह्यातील जावार शहरात राहतो. मोना कुमारी बरोबर लग्न करण्यासाठी मेघराज वरात घेऊन दिगोदजागीर गावात पोहोचला.

विवाहाचे विधी सुरु असताना मेघराजने मध्येच हुंडयामध्ये बाईकची देण्याची मागणी केली. मुलीच्या आई-वडिलांनी त्याची मागणी धुडकावून लावल्यानंतर संतापलेल्या मेघराजने विवाहाचे विधी अर्ध्यावर सोडून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने धक्का बसलेल्या मोना कुमारीने वडिल आणि अन्य नातेवाईकांसह मिळून पोलीस स्टेशनमध्ये मेघराज विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर शनिवारी सकाळी नवरदेव वधूच्या घरी पोहोचला व चर्चा सुरु केली. दोन्ही कुटुंबांनी विवाहाचे विधी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पोलिसांनी दिली.