सावधान! “आम्ही स्नॅपडील मधून बोलतोय, तुम्हाला कार बक्षीस मिळाली आहे”

0
257

पिंपळे गुरव, दि.०१ (पीसीबी) : निनावी फोन कॉलद्वारे आजकाल सर्रास फसवणूक केली जातेय. अशीच एक घटना समोर आली आहे. सांगवी परिसरात एका नोकरदाराची ‘आम्ही स्नॅपडील मधून बोलत आहोत. तुम्हाला एसयूव्ही कार बक्षीस मिळाली आहे’ असं सांगत तब्बल 20 लाख 88 हजार 350 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अनिलकुमार शीतलप्रसाद तिवारी (वय 51, रा. पिंपळे गुरव) यांची फसवणूक करण्यात आली असून याबाबत त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान पोलिसांनी एक महिला आरोपी, दयाशंकर जगदंबा प्रसाद मिश्रा आणि यंकप्पा अशा तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 28 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत घडला आहे. आरोपींनी फिर्यादी तिवारी यांना फोन करून ‘आम्ही स्नॅपडीलमधून बोलत आहोत. तुम्ही आमच्या कंपनीचा ऑक्सीमीटर घेतला आहे. तुम्हाला महिंद्रा कंपनीची एसयूव्ही 500 कार बक्षीस मिळाली आहे.’ असे सांगितले. कार लागल्याच्या आनंदात तिवारी यांच्याकडून आरोपींनी एसबीआय बँकेचे खातेधारक के बालाकृष्ण, झरना मिश्री, तोबुंग पर्टीन, प्रवीण शर्मा आणि इंडियन ओव्हरसिस बँकेचे खातेधारक संतोष वर्मा यांच्या बँक खात्यावर वेळोवेळी पैसे पाठवण्यास लावले. आरोपींनी वरील कालावधीत तिवारी यांच्याकडून तब्बल 20 लाख 88 हजार 350 रुपये घेतले.

पैसे घेऊन तर त्यांना कार दिली नाहीच पण त्यांची घेतलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत भारतीय दंड विधान कलम 420, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.