सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळालीच पाहिजे- उद्धव ठाकरे

0
344

मुंबई, दि. २३ (पीसीबी)-  केंद्र सरकारची पीक विमा योजना कंपन्यांच्या फायद्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. मात्र, विमा कंपन्यांच्या कारभारामुळे ९० लाख शेतकरी या योजनेस अपात्र ठरले आहेत. त्यासाठी काय निकष लावले गेले हे तपासण्याची गरज असून सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळालीच पाहिजे,’ अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

‘मातोश्री’ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीक विमा योजनेची अंमलबजावणी व विमा कंपन्यांच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. विमा कंपन्यांचे एजंट गावागावांत हफ्ते गोळा करतात. मात्र, नुकसानभरपाईच्या वेळी कोणी सापडत नाही. पीक विम्याचे २ हजार कोटी रुपये कंपन्यांकडे पडून आहेत. तो शेतकऱ्यांचा पैसा आहे. कंपन्यांचा नफा वगळून इतर सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत. कंपन्या देत नसतील तर सरकारने तो पैसा परत घेऊन अन्य यंत्रणेमार्फत तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवा. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांना एक पत्रही दिले आहे,’ असे उद्धव यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेने आवाज उठवल्यामुळे १० लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत ९६० कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. यापुढेही शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देईल, असे ते म्हणाले.