सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश लळित यांच्या मुलावर भाजप सरकार मेहरबान

0
252

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा मुलगा श्रीयश यू. लळित यांची उत्तर प्रदेश सरकारने सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यूपी सरकारने नियुक्त केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या पॅनेलचा ते एक भाग आहेत.

नवभारत टाइम्सच्या बातमीनुसार, शनिवारी योगी सरकारमधील विशेष सचिव निकुंज मित्तल यांनी एक अधिसूचना जारी केली. श्रीयश यांच्या व्यतिरिक्त यूपी सरकारने सुप्रीम कोर्टात आणखी तीन सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे.

हे उल्लेखनीय आहे की माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती लळित यांनी अलीकडेच सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते केवळ ७४ दिवस या पदावर राहतील आणि ८ नोव्हेंबर रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त होतील. लळित यांच्या कुटुंबातील चार पिढ्या न्यायव्यवस्थेशी संबंधित आहेत. श्रीयशची पत्नीही वकील आहे. यू यू लळित यांचे आजोबा उमेश रंगनाथ लळित हे सोलापूरमध्ये वकील होते. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी तेथे काम केले होते. सरन्यायाधीशांचे वडील उमेश लळित हे देखील पेशाने वकील आहेत. पुढे त्यांनी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले.

सरन्यायाधीश यांना दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा श्रीयश याची यूपी सरकारने वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा धाकटा मुलगा हर्षद अमेरिकेत संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे.