सर्वच आघाड्यांवर अपयशी सरकारला खाली खेचण्यासाठी मतदार तयार : संजोग वाघेरे पाटील

0
58
  • मावळ लोकसभा युवासेनेच्या मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद
  • पिंपरी, चिंचवड विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप
  • युवकांच्या माध्यमातून “मशाल आणि विचार” घरोघरी पोहचवण्याचा निर्धार

पिंपरी, दि. 8 (पीसीबी):- “गेल्या दहा वर्षांत पेट्रोल व डिझेल तसेच, गँस सिलेंडरचे दर वाढतच आहेत. ते दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत. इंधन दर वाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. बेरोजगारीने कळस गाठलेला आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी सामान्य मतदार तयार आहे. यामध्ये युवकांची भुमिका महत्वाची राहील”, असे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी‌ युवा सेनेच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हटले.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेच्या पदाधिका-यांचा मेळावा काळेवाडीतील इंदू लॉन्स येथे शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवा सेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. मेळाव्यात युवा सेनेच्या विविध पदांवरील १०० पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप या वेळी करण्यात आले. या मेळाव्यासाठी पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, राज्याच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, प्रचारप्रमुख योगेश बाबर, शहर संघटीका अनिता तुतारे, उप संघटीका वैशाली मराठे, युवासेना प्रमुख चेतन (अण्णा) पवार, युवा सेनेचे चिंचवड विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले, पिंपरी विधानसभा प्रमुख शुभम मुळे, दस्तगीर मणियार, मायाताई जाधव यांच्यासह शहरातील युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी, उपशहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विधानसभाप्रमुख, विधानसभा उपप्रमुख, तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले की, “सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडून, आपल्या कुटुंबाचा खर्च भागविणे अवघड होऊन बसले आहे. केंद्र सरकारला महागाईचा दर कमी करण्यात सपशेल अपयश आलेले आहे‌. नोक-या नसल्यामुळे आलेली बेरोजगारी चिंताजनक आहे. तळेगाव एमआयडीसीमध्ये फॉक्सवॅगनचा प्लांट आला असता, तर हजारो बेरोजगार यांच्या हाताला काम मिळाले असते. गेल्या दहा वर्षात देशावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. भाजपने देश कर्जाच्या विळख्यात अडकवला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार, दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये होणारा गोळीबार पाहता गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही”, अशी टीका त्यांनी केली.

अॅड. गौतम चाबुकस्वार म्हणाले की, “आमचं हिदुत्व जानवं आणि शेंडीचे नाही तर तरुणांना हाताला काम देणारं आहे. कार्यकर्त्यांना समान संधी देणारं आणि सन्मान करणारे हिदुत्व आहे. या लोकसभेत भाजप, अजित पवार गट आणि मिंधे गटाला मतदारच हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही”.

अॅड. सचिन भोसले म्हणाले की, “दोन कोटी युवकांना रोजगार देईन, अशी खोटी आश्वासने दिली. युवक हा देशाचा ताठ कणा आहे. देशाच्या भविष्याला बेरोजगार करून त्यांच्या आयुष्याची राख भाजप करत आहे. हे आता तळागाळातील जनतेला सांगणे गरजेचे आहे. तसेच युवसेनेच्या मेळाव्यात युवकांना शिलेदार बनण्याची जबाबदारी व‌ पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युव सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत आहे. मावळ लोकसभेत संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी मिळाली. मी एवढंच सांगेन “ये तो खाली झाकी है, पिक्चर अभी बाकी है ” उद्धव ठाकरे साहेबांचे‌ शिलेदार वाघेरे पाटील मावळ लोकसभेचे खासदार असतील”.

योगेश बाबर म्हणाले की, “आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे युथ आयकॉन आहेत. शिवसेना महराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष असल्याशिवाय राहणार नाही. मावळ लोकसभेत आपण खासदार निवडून देवून पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना आपण भेट द्यायची आहे. उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जनतेला आवाहन करण्याचे काम करायचे आहे”.

अनंत को-हाळे, अमोल निकम, राजाराम कुदळे, अनिता तुतारे, वैशाली मराठे, दस्तगीर मणियार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त केले. कोल्हापूर वासिय युवकांचे संघटन शहरात संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठिशी उभा करण्याचे वैभव चौगुले यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश मोरे यांनी केले. आभार विशाल नाचपल्ले यांनी मानले.

स्वतःसाठी पक्ष बदलणा-या गद्दारांना धडा शिकविणार; युवासेनेचा निर्धार

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना प्रमुख चेतन (अण्णा) पवार म्हणाले की, “भाजपाने देशात आणि राज्यात लोकशाही संपवण्याचा डाव आखला गेला आहे. लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे वाटचाल करण्याची मानसिकता काही लोकांची आहे. ही मानसिकता हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आज पर्यंत पिंपरी, चिंचवड विधानसभेत युवा सेनेचा असा मेळावा कधी झालाच नाही. मावळ लोकसभा मतदारसंघातील गावा गावात पक्ष आणि चिन्ह घराघरात पोहचवण्याचे काम करत आहे. गेले ते कधीच आपले नव्हते, त्यांनी स्वतः साठी पक्ष बदलला अश्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी हा मेळावा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात‌ शिलेदार संजोग वाघेरे पाटील यांना जास्तीत जास्त मताधक्याने निवडून देवू”, असा निर्धार यावेळी युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला.