संभाजी भिडेंविरोधात वारकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी कराव्यात

0
849

नगर, दि. ११ (पीसीबी) –  ज्ञानोबा व तुकोबापेक्षा मनू श्रेष्ठ असल्याचे सांगत संभाजी भिडे यांनी दोन विचारसरणीत भांडणे लावण्याचे कारस्थान सुरू केले आहे, याविरोधात वारकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज, मंगळवारी नगरमध्ये बोलताना केले.

आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज नवीन टिळक रस्त्यावरील माउली मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजय मोरे, माजी आमदार हरिभाऊ भदे, प्रा. किसन चव्हाण, डॉ. अरुण जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

संभाजी भिडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होणार नाही, आरएसएस भिडेंच्या माध्यमातून बोलत आहे, भाजप व आरएसएस आज संविधान बदलाची घोषणा करत आहेत. परंतु आम्हाला संविधान वाचवायचे आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत धनगर, माळी, मुस्लिम, भटके विमुक्त, ख्रिश्चन यांना कधी सत्ता मिळालीच नाही, राईनपाडाच्या घटनेनंतर आमचा स्वातंत्र्यावरचा व राजकीय पक्षांवरचा विश्वास उडाला आहे, निवडणुकीतून केवळ घराणेशाही जोपासली गेली, आता आम्हाला आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सत्ताधारी बनायचे आहे.