संघनिवड लोकांना खूश करण्यासाठी नको; गांगुलीने निवड समितीला सुनावले

0
391

नवी दिल्ली, दि २४ (पीसीबी) – भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने अनुभवी अजिंक्य रहाणे आणि युवा शुभमन गिल यांची वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात निवड न केल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत निवड प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निवडकर्त्यांचे मुख्य काम सर्वश्रेष्ठ उपलब्ध संघाची निवड करणे हे असून लोकांना खूश करणे हे त्यांचे काम नव्हे, अशा शब्दांत गांगुलीने निवड समितीला सुनावले आहे. निवड समितीने आपल्या निवडप्रक्रियेतील धोरणात सातत्य ठेवायला हवे, असेही गांगुलीने म्हटले आहे. केदार जाधव चांगल्या कामगिरीत सातत्य राखू शकला नसतानाही तो संघात आहे, मात्र वेस्ट इंडीजमध्ये पाच भारत-अ सामन्यांच्या मालिकेत २१८ धावा करून मालिकावीर राहिलेल्या गिलला मात्र संघात स्थान मिळाले नाही, याकडे गांगुलीने लक्ष वेधले आहे.

गांगुलीने ट्विटद्वारे आपले मत व्यक्त केले आहे. गांगुली ट्विटमध्ये म्हणतो, ‘लय आणि आत्मविश्वास कायम राखण्याची वेळ आली आहे. निवडकर्त्यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये समान खेळाडूंची निवड करावी. सर्व प्रकारांमध्ये अगदी थोडेच खेळाडू खेळतात. मजबूत संघात सतत चांगली कामगिरी करणारे खेळाडू असतात. सर्वांनाच खूश करण्याची गरज नाही. देशासाठी सर्वश्रेष्ठ संघाची निवड करणे आणि निवडीत सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे.’

‘भारतीय संघात टी-२०, वनडे आणि कसोटी अशा सर्व प्रकारांमध्ये खेळणारे अनेक खेळाडू आहेत. शुभमन संघात नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे. रहाणे देखील एकदिवसीय सामन्यात हवा होता’, असेही गांगुलीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीच्या संघात कॅरेबिया दौऱ्यासाठी निवड न झाल्याने शुभमनने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे.