हरभजन सिंगचा ‘खेल रत्न’साठीचा अर्ज रद्द

0
433

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – प्रतिष्ठित राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी पंजाब सरकारने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग याच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, तो अर्ज क्रीडा मंत्रालयाने रद्द केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्टार धावपटू दुती चंदलाही अर्जुन पुरस्कार मिळणार नाही. या पुरस्कारासाठी तिच्या नावाची शिफारस केली होती. मात्र ती रँकिंगमध्ये मागे पडली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्जुन पुरस्कारासाठी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावांची शिफारस केली आहे. यावर्षी खेल रत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयनं एकाही खेळाडूच्या नावाची शिफारस केली नाही. या पुरस्कारासाठी पंजाब सरकारने हरभजनच्या नावाची शिफारस केली होती. अंतिम मुदत ३० एप्रिल होती. मात्र, हरभजनच्या नावाच्या शिफारशीचा अर्ज २५ जून रोजी क्रीडा मंत्रालयाला मिळाला. त्यामुळे तो रद्द करण्यात आला. याशिवाय धावपटू दुती चंदलाही अर्जुन पुरस्कार मिळणार नाही. एका क्रीडा महासंघाकडून अर्जुन पुरस्कारासाठी तीन नावे पाठवली जातात. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) दुती आणि मनजीत याच्यासह तेजिंदर पाल सिंह तूर, स्वप्ना बर्मन, अरपिंदर सिंह यांचीही नावे पाठवली होती. ही नावे पाठवताना यादीत मनजीतचं चौथ्या आणि दुतीचे नाव पाचव्या क्रमांकावर होते.

दरम्यान, क्रीडा मंत्रालयाकडून खेळाडूंच्या नावांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, ती लवकरच खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार समितीकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या खेळाडूंच्या नावांची यादी अंतिम निर्णयासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे पाठवण्यात येईल.