शिवसेनेला नारायण राणेंनी दिला जोरदार धक्का; नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राणे समर्थक विजयी

0
377

महाराष्ट्र,दि.३०(पीसीबी) – कोकणात कणकवली विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता सर्वत्र शिवसेनेचे वर्चस्व आहे. दीपक केसरकर यांनी २०१४ साली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. दीपक केसरकरांनी फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्रीपदही भूषवले आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना, कोकणात सावंतवाडीमध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेला जोरदार झटका दिला आहे. वारंवार प्रयत्न करुनही नारायण राणेंना सावंतवाडीचा केसरकरांचा किल्ला भेदता येत नव्हता. अखेर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निम्मिताने राणेंना सावंतवाडीत यश मिळाले आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत दीपक केसरकरांच्या उमेदवाराचा पराभव झाला असून, राणे समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत. सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक पार पडली.भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर, भाजपाचे अधिकृत उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब, महाविकास आघाडीचे खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, अमोल साटेलकर असे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

या निवडणुकीत भाजपाच्या संजू परब यांनी शिवसेनेच्या बाबू कुडतरकर यांचा तब्बल ३१३ मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंनी आपली ताकद भाजपाचे बंडखोर उमेदवार राजन तेली यांच्यापाठिमागे उभी केली होती. पण त्यावेळी राणेंना यश मिळाले नव्हते. नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राणेंनी ही कसर भरुन काढली आहे.