शिवसेना-भाजपा युतीसाठी संभाजी भिडेंची ‘मध्यस्थी’, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

0
473

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले तरी सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटू शकलेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी ठरले होते, त्याप्रमाणे सत्तेत वाटा हवा अशी शिवसेनेची मागणी असून मुख्यमंत्री पद हा सत्तासंघर्षातील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा निघणे सध्या तरी कठीण वाटत असून दोन ते तीन दिवसांत सत्तापेच न सुटल्यास राष्ट्रपती राजवट अटळ मानली जात आहे. दरम्यान शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे शिवसेना-भाजपाची युती व्हावी यासाठी मध्यस्थी करत आहेत अशी चर्चा सुरु आहे. कारण गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले संभाजी भिडे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.

संभाजी भिडे गुरुवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने संभाजी भिडे यांची भेट होऊ शकली नव्हती. संभाजी भिडे कोणतीही पूर्वसूचना न देता मातोश्रीवर आले होते. पण उद्धव ठाकरेंची भेट होऊ न शकल्याने त्यांना मोकळ्या हाती परतावे लागले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजी भिडेंची भेट घेण्यास नकार दिला अशी चर्चा सुरु झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ट्विट करत हा दावा केला. संभाजी भिडे हे मातोश्रीवर संघ आणि भाजपाकडून सत्तास्थापनेसंदर्भात प्रस्ताव घेऊन आले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

पण शिवसेनेकडून स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने भेट झाली नाही, त्यामुळे भेट नाकारली असे म्हणणे चुकीचे आहे असे सांगण्यात आले. पण संभाजी भिडे यांच्या भेटींमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.