शिवसेना बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा लढवणार

0
772

पाटणा, दि. २५ (पीसीबी) – बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. आगामी लोकसभा निवणुकीत शिवसेना ४० जागावर  उमेदवार  उभे करणार  आहे, अशी माहिती बिहार शिवसेनेचे अध्यक्ष कौशलेंद्र शर्मा यांनी दिली.  लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही विधानसभेसाठी जोरदार शक्तीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहोत, असे त्यांनी यावेळी  सांगितले.

बिहारचा विकास आणि राष्ट्रवाद हा निवडणुकीच्या प्रचारातील अजेंडा असेल. हा मुद्दा घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. शिवसेना कधीही बिहारच्या विरोधात नव्हती. बिहारच्या मुद्द्याविरोधात शिवसेनेने राज ठाकरे यांचा पक्ष मनसेचाही विरोध केला आहे आणि टीकाही केली आहे. तसेच मुंबईतील छठ पूजामध्ये शिवसैनिकांचा सहभाग असतो, असे कौशलेंद्र शर्मा यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, २०१५ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर  निवडणूक रिंगणात उतलेली होती. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. आता शिवसेनेने बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिहारमध्ये शिवसेना  भाजपसमोर मोठे आव्हान उभे करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.