शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी, तोंड कुठे आहे, तेच समजत नाही – राज ठाकरे

0
1085

मुंबई, दि. १० (पीसीबी) ज्या पक्षाला स्वतःची भूमिका नाही, त्या पक्षाबद्दल काय बोलणार असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेची तुलना केसाळ कुत्र्याशी केली. या कुत्र्याला येथून बघायचे की तिथून बघायचे हेच कळत नाही, असे ते म्हणाले. शिवसेना धोरण नसलेला व फक्त पैशाची कामे होण्यासाठी सत्तेत राहिला आहे, असा सनसनाटी आरोपही  राज ठाकरेंनी आज (सोमवार) येथे केला.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,  केसाळ कुत्र्याचे तोंड कुठल्या बाजूला आहे, तेच कळत नाही. शिवसेनेची भूमिका केसाळ कुत्र्यासारखी आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

भाजप सत्तेत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणे, गॅसचे दर वाढणे हे लाजिरवाणे आहे. आज तुम्ही सांगता की इंधनाचे दर आमच्या हातात नाही, मग जेव्हा विरोधात होतात तेव्हा आंदोलन का केले होते? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली.

काँग्रेसच्या आंदोलनात मनसे का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, आमच्यासाठी महत्त्वाचे पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. महागाईचा भडका उडाला आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आंदोलन केले.