शिरूर लोकसभा मतदारसंघात २१ लाख ७३ हजारपैकी १२ लाख ९२ हजार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

0
646

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातील २१ लाख ७३ हजार ४८४ मतदारांपैकी १२ लाख ९२ हजार ३८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २ लाख ३७ हजार ७६७ मतदारांनी मतदान केले आहे. त्याखालोखाल हडपसर विधानसभा मतदारसंघातील २ लाख ३३ हजार ३१६ मतदारांनी मतदान केले आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात २ लाख २७ हजार ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) मतदान पार पडले. या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या २१ लाख ७३ हजार ४८४ आहे. त्यातील ५९.४६ टक्के मतदारांनी म्हणजे १२ लाख ९२ हजार ३८१ मतदारांनी मतदान केले आहे. शिरूर मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमधील भोसरी, पुणे शहरातील हडपसर तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी आणि शिरूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण ४ लाख १३ हजार ६८० मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ३७ हजार ७६७ (५७.४८ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण ४ लाख ८७ हजार ६९९ मतदार आहेत. त्यातील २ लाख ३३ हजार ३१६ (४७.८४ टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. त्याखालोखाल शिरूर विधानसभा मतदारसंघात मतदान झाले आहे. या मतदारसंघात एकूण ३ लाख ६९ हजार ८७२ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख २७ हजार ५४१ (६१.५२ टक्के) मतदारांनी मतदान केले आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ९८ हजार ८४८ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ९३ हजार ९६५ (६४.९० टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याशिवाय आंबेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८० हजार ३३४ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ९७ हजार ५२ (७०.२९ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २३ हजार ५१ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख २ हजार ७४० (६२.७६ टक्के) मतदारांनी मतदान केले आहे.