शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांची बनवाबनवी; आधीच विकसित गाव दत्तक घेऊन केला पुन्हा विकास

0
889

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – सलग १५ वर्षे खासदार राहिलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक धक्कादायक कबुली दिली आहे. सुरूवातीची १० वर्षे मतदारसंघाला मी न्याय देऊ शकलो नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ दहा वर्षे त्यांनी केवळ खासदार म्हणून मिरवण्याचे काम केले हे स्पष्ट होते. तसेच गेल्या पाच वर्षांत शिरूर मतदारसंघात साडे चौदा हजार कोटींची कामे केल्याचा दावा त्यांनी केला आहे. आढळराव पाटील यांनी खासदार म्हणून शिरूर तालुक्यातील करंदी हे गाव दत्तक घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आधीच विकास झालेले हे गाव आहे. शिरूर मतदारसंघात मागास आदिवासी राहणारी अनेक गावे आहेत. आढळराव पाटील यांनी या आदिवासी गावांकडे १५ वर्षांत साधे ढूंकून सुद्धा पाहिलेले नाही. उलट आधीच विकासाकडे वाटचाल करणारे एक गाव दत्तक घेऊन आढळराव पाटील आता त्याचेच भांडवल करत आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.

शिरूर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग १५ वर्षे एकाच पक्षाकडून खासदार आहेत. त्यामुळे साहजिकच मतदारांनी आढळराव पाटील यांच्याकडून मतदारसंघ विकासाच्या खूप अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. १५ वर्षे खासदारकी होती, तर मतदारसंघाचा काय विकास केला हे यंदाच्या निवडणुकीत आढळराव पाटलांना विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून वारंवार विचारले जात आहे. त्याला प्रत्येक सभांमधून उत्तर देताना आढळराव पाटलांची दमछाक होत आहे. पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण, पुणे-नाशिक रेल्वे, विमानतळ, उद्योगांची उभारणी, पर्यटन केंद्र बनविणे हे प्रमुख प्रश्न अजूनही सुटलेले नसल्याने आढळराव पाटील यांची प्रचारात अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आढळराव पाटील हे सर्व प्रश्न सुटले असून, कामे मंजूर झाल्याचे मतदारांना सांगत आहेत. ही कामे आता मंजूर झाली आहेत, तर आढळराव पाटलांनी १५ वर्षे काय केली?, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. अशा परिस्थितीत कोंडी झालेल्या आढळराव पाटलांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक कबुली दिली आहे. सुरूवातीची १० वर्षे आपण मतदारसंघाला न्याय देऊ शकलो नसल्याची कबुली दिली आहे. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली आहे. गेल्या पाच वर्षात शिरूर मतदारसंघात साडेचौदा हजार कोटींची कामे केल्याचा दावा ते माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांनी सुरूवातीची १० वर्षे केवळ खासदार म्हणून मिरवण्याचे काम केले हे स्पष्ट होते.

आढळराव पाटील हे खासदारकी भूषवत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात मागास आदिवासी राहत असलेली अनेक गावे आहेत. ही गावे विकासांपासून कोसो दूर आहेत. या गावांचा पुढील ५० वर्षांत तरी विकास होईल की नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याची योजना सुरू केल्यानंतर शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील हे शिरूर मतदारसंघातील एखादे आदिवासी राहत असलेले गाव दत्तक घेतील, अशी मतदारांना अपेक्षा होती. परंतु, मतदारांची ही अपेक्षा फोल ठरली. सलग तीनवेळा निवडून आलेले खासदार आढळराव पाटील यांनी आधीच विकासाकडे वाटचाल करणारे शिरूर तालुक्यातील करंदी हे गाव दत्तक घेतले.

या गावातील नागरिकांनी आपल्या भल्याचा आधीच विचार करून गावात अनेक सोयी सुविधा निर्माण केल्या होत्या. तेच गाव आढळराव पाटील यांनी दत्तक घेतले. तेथील गावकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीने गावात केलेला विकास हे मीच केल्याचा दावा आढळराव पाटील यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे. यावरून आढळराव पाटील हे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यात कसे दक्ष लोकप्रतिनिधी आहेत हे स्पष्ट होते. याच मुद्द्यावरून त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने निवडणुकीत त्यांना चांगलेच घेरले आहे. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीने विकासाच्या मुद्द्यावरून आढळराव पाटील यांची चांगलीच दमछाक केल्याचे पाहायला मिळत आहे. आता २३ मे रोजी निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.