शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांची बनवाबनवी; आधीच विकसित गाव दत्तक घेऊन केला पुन्हा विकास

0
511

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – सलग १५ वर्षे खासदार राहिलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक धक्कादायक कबुली दिली आहे. सुरूवातीची १० वर्षे मतदारसंघाला मी न्याय देऊ शकलो नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ दहा वर्षे त्यांनी केवळ खासदार म्हणून मिरवण्याचे काम केले हे स्पष्ट होते. तसेच गेल्या पाच वर्षांत शिरूर मतदारसंघात साडे चौदा हजार कोटींची कामे केल्याचा दावा त्यांनी केला आहे. आढळराव पाटील यांनी खासदार म्हणून शिरूर तालुक्यातील करंदी हे गाव दत्तक घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आधीच विकास झालेले हे गाव आहे. शिरूर मतदारसंघात मागास आदिवासी राहणारी अनेक गावे आहेत. आढळराव पाटील यांनी या आदिवासी गावांकडे १५ वर्षांत साधे ढूंकून सुद्धा पाहिलेले नाही. उलट आधीच विकासाकडे वाटचाल करणारे एक गाव दत्तक घेऊन आढळराव पाटील आता त्याचेच भांडवल करत आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.