शहर परिसरात सात चोरीच्या घटनांमध्ये 9 लाख 38 हजारांचा मुद्देमाल चोरीला

0
447

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – एमआयडीसी भोसरी, निगडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या सात घटना उघडकीस आल्या आहेत. या सात घटनांमध्ये तब्बल 9 लाख 38 हजार 610 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 17) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी भोसरी मधील एस ब्लॉक मध्ये शार्प लेजरटेक या कंपनीत चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पत्र्याच्या कंपाउंडवरून उडी मारून कंपनीत प्रवेश करत एक लाख 77 हजार 720 रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना 15 मे रात्री साडेआठ ते 16 मे सकाळी साडेआठ या कालावधीत घडली. याप्रकरणी संतोष मारुती नांदवडेकर (वय 46, रा. पूर्णानगर चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याचे दागिने बनविण्याच्या दुकानातून दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांनी पाच लाख 51 हजार 200 रुपयांचा सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेला सोन्याचा तुकडा चोरून नेला. सुबीर गोपाले पांजा (वय 40, रा. कोलकाता), गौतम कालीपाडा पांजा (वय 33, रा. कोलकाता) अशी गुन्हा दाखल झालेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन भवरलाल सोनिगरा (वय 38, रा. चिंचवड स्टेशन) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमाटणे फाटा येथे घराच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने 70 हजारांची बुलेट दुचाकी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 17) मध्यरात्री पावणे दोन वाजता घडली. याप्रकरणी विक्रम नारायण येवले (वय 28, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निगडी गावठाण येथे घराच्या गॅलरीच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अनोळखी चोरट्याने 39 हजार 690 रुपयांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 17) मध्यरात्री साडेबारा ते सकाळी सात वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेहरूनगर पिंपरी येथे घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी एक मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप असा 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 17) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. दादा किसन कळसकर (वय 43, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चाकण पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पहिल्या गुन्ह्यात रोहिदास केश शेळके (वय 22, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. निघोजे येथील इंटिवा प्रोडक्शन इंडिया ऑटोमोटिव्ह प्रा ली या कंपनीच्या बाहेर पार्क केलेली फिर्यादी यांची 30 हजारांची दुचाकी सोमवारी (दि. 16) दुपारी तीन ते रात्री साडेआठ वाजताच्या कालावधीत चोरीला गेली.

दुसऱ्या गुन्ह्यात सचिन हरीचंद्र झेंडे (वय 43, रा. खरपुडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. 25 एप्रिल रोजी बिरदवडी फाटा येथून फिर्यादी यांची 15 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे.