शहरातील 254 जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

0
207

पिंपरी, दि. 18 (पीसीबी) : जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलिसांनी 254 जुगार अड्ड्यांवर छापे मारले आहेत. राहण्यायोग्य शहरांची यादी दरवर्षी प्रसिद्ध होते. त्या यादीत पुणे, पिंपरी चिंचवड शहरांनी सुद्धा स्थान मिळवले आहे. स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जातो. पण अवैध धंदे मुक्त शहर अशी स्पर्धा झाल्यास पिंपरी चिंचवड शहर स्पर्धेतून बाद होईल, अशी स्थिती आहे. सध्या अनेक जुगार अड्ड्यांवर कारवाई होत आहे. त्यामुळे अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले म्हणावे तर तशीही सोय नाही. कारण येणाऱ्या प्रत्येक दिवशी चार-दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे पडलेले असतात.

सप्टेंबर महिन्यात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्त पदाची धुरा हाती घेतली. त्यानंतर त्यांनी लगेच गुन्हेगार, अवैध धंदे चालकांना सज्जड दम देत ‘मी शहरात असेपर्यंत दुसरे धंदे शोधा’ असा सल्ला दिला. पोलीस ठाण्याच्या गडकऱ्यांना अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पहिल्याच बैठकीत दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाला बहुतांश अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आणि शहरातील अवैध धंदे जोमात सुरू राहील.

पोलीस आयुक्तांच्या ही बाब निदर्शनास न येईल तोच नवल. आपण आदेश देऊनही शहरात अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी अवैध धंद्यांवर वचक निर्माण करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना केली. स्थानिक पोलिसांच्या अगोदर सामाजिक सुरक्षा विभागाला अवैध धंद्यांची माहिती मिळू लागली आणि त्यावरील कारवाईला वेग आला.
आपल्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांची माहिती अपल्या अगोदार सामाजिक सुरक्षा विभागाला मिळत असल्याने स्थानिक पोलिसांनी देखील कंबर कसली आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात शहरातील तब्बल 75 जुगार अड्ड्यांवर छापे मारण्यात आले. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत सुमारे 10 ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 254 जुगार अड्ड्यांवर छापे मारण्यात आले. हे प्रमाण मागील वर्षी 237 एवढे होते.

मार्च, एप्रिल, मे आणि जून महिना वगळता यावर्षी सर्व महिन्यात कारवाईचा आलेख चढताच आहे. कोरोना काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यासाठी मुभा नसल्याने या काळात अनेक जुगार अड्डे ओस पडले असल्याचे म्हटले जाते. परंतु पोलिसांचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने जुगार अड्ड्यांवर व इतर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना उसंत मिळाली नाही. त्यामुळे हा आकडा कमी दिसत आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने यावर्षी 28 कारवाया केल्या. तर हा आकडा मागील वर्षी 39 एवढा होता. पोलिसांनी गांजा, ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थ जप्त केले. ऑक्टोबर महिन्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी सर्वात मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली. 20 किलो मफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले. तसेच आरोपींनी ज्या ज्या ठिकाणी ड्रग्ज तयार केले तिथवर पोहोचून अनेक आरोपींना बेड्या ठोकल्या.
अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा पोलीस आयुक्तांनी चंग बांधला आहे. त्यासाठी अनेक पोलीस अधिकारी साथ देत आहेत. तोपर्यंत शहरातील सर्व अवैध धंदे चालक, मालक दुसरा धंदा शोधतील आणि सन्मानाने जगण्याच्या मार्गाला लागतील. त्यानंतर पोलिसांच्या कारवाया थांबतील आणि अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी स्थापन केलेले सामाजिक सुरक्षा पथक बरखास्त होईल, अशी गोड कल्पनाच केलेली बरी.