शरद पवार मंगळवारपासून राज्याच्या दौऱ्यावर; पक्षातील गळती रोखणार ?

0
433

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाला उभारी देण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार  मंगळवारपासून  ( दि.१७)   राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत.  त्यांच्या दौऱ्याची सुरूवात सोलापुरातून होणार आहे.  भाजप-शिवसेनेकडे जाणाऱ्या नेते- पदाधिकाऱ्यांना थोपवणे व पक्षात अजूनही असलेल्यांना विश्वास देणे,  हाच या दौऱ्याचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबतची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.  या  राज्यव्यापी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड,  लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांत बैठका घेऊन नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पवार  संवाद साधणार आहेत.

सोलापुरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची पहिली बैठक होणार आहे. पवारांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलेला माढा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येतो. मागील निवडणुकीत पक्षांतर्गत राजकारणामुळे या मतदारसंघातून पवारांना माघार घ्यावी लागली होती. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पवार याच जिल्ह्यातून करणार आहेत.