शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाक्‌युध्द 

0
460

मुंबई, दि.१ (पीसीबी) – अहमदनगर जिल्ह्यात पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकाराच्या प्रश्नांवर संताप व्यक्त केला. पवार यांचा हा स्वभाव पहिल्यांदाच पाहिला मिळाला. यावर अनेक जण आश्चर्यही व्यक्त करत आहे. आता यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये जुंपली आहे.   

यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो पोस्ट करून पवार साहेबांना प्रश्न विचारणारे नि:पक्षपाती पत्रकार श्रीरामपूरचे हरीश दिमोटेजी विखेंच्या गाडीवर पार्टटाइम ड्रायव्हर म्हणून रोजी रोटी कमावतात, पत्रकारिता हा त्यांचा छंद आहे, असे विधान करत दिमोटे यांच्यावर टीका केली होती.  याला युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सत्यजित तांबे यांनी मी स्वत: हरीष दिमोटेला गेली १५-१७ वर्ष बघतो आहे. हरीष सारखे अनेक पत्रकार हलाखीच्या जीवनातून संघर्ष करत प्रगती करणारे आहेत.  स्वत:ची गाडी घेतली व त्यात कुणी मोठा माणूस बसला की कौतुकाने आपण फोटो काढतो. लगेच त्याला ट्रोल करणे म्हणजे मुर्खपणाचे आहे,  असे ट्वीट केले आहे.

तसेच पुढे त्यांनी अनेकदा पत्रकार बातमीच्या नादात नेत्यांना वैतागून सोडतात, पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाने एकदा  हा विषय घेऊ नका, असे  सांगितल्यावर हरीषने थांबायला पाहीजे होते, हे बरोबर, मात्र त्यामुळे त्याला अशा पद्धतीने ट्रोल करणे चुकीचे आहे. ही माझी भूमिका आहे, असे ट्वीट सत्यजित तांबे यांनी केले.