शरद पवारांना दुष्काळाचे चांगले ज्ञान पण पाणी, शेतीबाबत कोणत्या योजना राबविल्या? – उद्धव ठाकरे

0
456

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – महाराष्ट्र सध्या गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. शेवटचे मतदान संपताच शरद पवार यांनी राज्यभरात दुष्काळी दौरे सुरू केले. दुष्काळ निवरणासाठी सरकार काहीच करत नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सवाल विचारला आहे.

शरद पवार यांना शेती, पाणी, दुष्काळ यातील ज्ञान चांगले आहे. अनेक वर्षे त्यांच्याही हातात केंद्राची तसेच राज्याची सत्ता होती. मग पाणी व शेती याबाबत त्यांनी कायमस्वरूपी कोणत्या योजना राबविल्या? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

जलयुक्त शिवाराची योजना सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राबविली आहे, पण आधीच्या सरकारात सगळ्यात मोठा घोटाळा जलसिंचनाच्या योजनांत झाला आहे हे पुराव्यानिशी समोर आल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. पवारांकडून दुष्काळाचे राजकारण केले जात असल्याची चिंता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. दुष्काळाचे राजकारण करण्यापेक्षा दुष्काळ निवारणाच्या कामात सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करा असे पाटलांनी विरोधकांना ठणकावले ते योग्यच आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.