शरद गवत आण.. छगन कमळ बघ म्हणत,  मुख्यमंत्र्यांचे अजितदादांना प्रत्युत्तर

0
737

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – गणिताच्या पुस्तकात संख्या वाचन करण्याच्या पद्धतीत जे बदल करण्यात आले त्यावर टीका करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडण दोन शून्य अशी हाक मारायची का? असा प्रश्न विचारत टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी जशास तसे उत्तर दिले. बोलण्यात सुलभता यावी म्हणून संख्यावाचना निर्णय घेण्यात आला. दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, हसन झटकन उठ, शरद गवत आण असे बालभारती पहिलीच्या पुस्तकातले उतारे वाचून दाखवले. ज्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मी कोणत्याही सदस्यावरून बोलत नाही जे लिहिले आहे ते वाचून दाखवल्याचेही सांगितले.

संख्या वाचनाच्या नवीन पद्धतीवर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. नव्या संख्यावाचन पद्धतीनुसार उर्जामंत्री बावनकुळे यांना हाक मारताना ओ पन्नास दोनकुळे साहेब अशी हाक मारायची का? किंवा पन्नास दोनकुळे साहेब आले असे म्हणायचे का? आणि मुख्यमंत्र्यांचे आडनाव फडण दोन शून्य अशा पद्धतीने घ्यायचे का? असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले होते. ज्यानंतर या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पहिलीच्या पुस्तकातला उतारा वाचला. दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण अशी वाक्यंच वाचून दाखवल्याने सभागृहातल्या सगळ्याच आमदारांना आणि नेत्यांना हसू अनावर झाले. तसेच संख्यावाचनाच्या पद्धतीबाबत आक्षेप असतील तर त्यासाठी विशेष समिती नेमली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.