शपथविधीआधी मोदींची शहिदांना आदरांजली, महात्मा गांधी, अटलजींना केले अभिवादन

0
392

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ( गुरुवारी)  संध्याकाळी सात वाजता शपथविधी होणार आहे. त्याआधी मोदी यांनी शहिदांना आदरांजली वाहिली. सकाळी  महात्मा गांधीजींना राजघाटवर नमन केल्यानंतर अटलजींना अभिवादन करण्यासाठी मोदी अटलजींच्या समाधीस्थळाकडे रवाना झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर नरेंद्र मोदींनी शहिदांनादेखील आदरांजली वाहिली. यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत, नौदल प्रमुख सुनिल लांबा आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंह भदुरिया उपस्थित होते.

नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी तब्बल ६ हजार पाहुण्यांना आमंत्रण  दिले आहे. शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख येणार आहेत. गतवर्षी वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण होते. मात्र, या वेळी पाकिस्तानला वगळण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग शपथविधासाठी उपस्थित राहणार आहेत.