मोशीत घरात गरम होते म्हणून गच्चीवर झोपायला गेले अनं घरात झाली पावणेदोन लाखांची चोरी

0
796

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – घरात गरम होते म्हणून घराला कुलुप लावून गच्चीवर झोपायला गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यामध्ये सोन्याचे कानातले, अंगठी, पैजण आणि १ लाख २७ हजारांची रोख असा एकूण १ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना मंगळवार (दि.२८) रात्री साडेनऊ ते बुधवार (दि.२९) सकाळी साडेसातच्या दरम्यान गणेश मंदिर कॉलणी क्र.१, सर्वे क्र. ४५२, गंधर्वनगरी, मोशी येथे घडली.

याप्रकरणी तुकाराम भिकाजी गव्हाणे (वय ३६, रा. गणेश मंदिर कॉलणी क्र.१, सर्वे क्र. ४५२, गंधर्वनगरी, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री फिर्यादी तुकाराम हे घरात गरम होत असल्याने घराला कुलुप लावून राहत्या घराच्या गच्चीवर झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच सोन्याचे कानातले, अंगठी, पैजण आणि १ लाख २७ हजारांची रोख असा एकूण १ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.