शक्तीप्रदर्शन भोवले; चिंचवड येथील आकाश लांडगे खून प्रकरणातील आरोपी रणजीत चव्हाण याला अटक

0
9756

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – चिंचवड येथील आकाश लांडगे खून प्रकरणातील मुख्य आरोपी रणजीत उर्फ रंज्या बापू चव्हाण याने सोमवारी (दि.२१) जामिनावर सुटताच वेताळनगर परिसरात १०० ते १५० टोळक्यांना जमा करुन मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले होते. त्याचा व्हीडिओ देखील तयार करुन सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार, चिंचवड पोलिसांनी रणजीत याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच २०१७ मध्ये जबरी चोरी आणि दंगलीच्या गुन्ह्यात तो फरार असल्याने त्याला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे गुन्हे करुन पुन्हा शहर परिसरात अपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांवर चाप बसणार आहे. तसेच पोलिसांनी देखील आता सोशल मिडियावर नजर ठेवायला सुरुवात केल्याने सोशल मिडियावर आपला प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर चाप बसणार आहे. (पहा व्हिडिओ)